Sunday, February 5, 2012

केव्हढा हा होमवर्क!

मी रोज आईला सांगत असतो कि माझी टीचर मला खूप जास्त होमवर्क देते. पण आईला ते पटतच नाही! आत्ता कालच बघाना. मला टीचरने १ ते ५० लिहायला सांगितले होते. मला किनई खूप कंटाळा आला होता. म्हणून मी आईला म्हणालो कि मी १ ते ४० च लिहिणार. त्यावर आई मला रागावली! म्हणाली १ ते ५० च लिहायचं.  मग मी तिला म्हणालो कि तू मला थोडा discount दे न! काय झालं माहितीये का मग? आईला कळलंच नाही कि मला discount  कसं माहित ते. तिने विचारल्यावर मी समजावलं कि ती कशी नेहमी जाहिराती बघून १०% , २०% discount म्हणत असते. त्यावरून मला कळलंय.  आई जरा चकितच झाली होत्ती! इतकं करून सुद्धा आईने मला सगळ लिहायलाच लावलं. 

 होमवर्क झाल्यावर मी आईला विचारलं कि तिला कुठे  होमवर्क असतो. तर ती म्हणाली कि घरी आल्यावर तिला जे काम करावे लागते जसं कि ईशान्यला भरवणे, माझा अभ्यास घेणे, आम्ही दोघांनी केलेले पसारे आवरणे इ. हा सगळा तिचा  होमवर्क! मग मी खूप वेळ विचार करत होतो. मला वाटलं कि जसा मला, आईला, आज्जीला, बाबांना  होमवर्क आहे तसा ईशान्यला का नाही? पण मग मी समजलो कि दंगा करणे, माझ्याशी मस्ती करणे, घरभर हुंदडणे हा त्याचा घरचा अभ्यास! मी तसं आईला सांगितल्यावर तिने मला शाब्बास म्हटले. आहे कि नाही मी हुशार? 

पण तरी पण एक प्रश्न राहिलाच माझ्या मनात. तो मी आईला दुसऱ्या दिवशी विचारला. मी म्हणालो आईला कि देवबाप्पाचा  होमवर्क काय बरं? पण लगेचच मला त्याचे उत्तर सुचले सुद्धा! माझ्या सारख्या छोट्या छोट्या हुशार मुलांना बनवणे हाच देवबाप्पाचा  होमवर्क! हो कि नाही? आहे कि नाही मी हुशार?

मी लहानपणापासून किती अभ्यासू आहे न!

1 comment: