Friday, June 6, 2014

पुनरागमन अर्थात Welcome Back

हेल्लो मित्रांनो ! कित्ती दिवसांनी मी तुम्हाला भेटतोय ना? मी आता दुसरीत गेलो माहितीये!
मी आता मोठ्ठ्या मुलांच्या शाळेत जातो. माझ्या शाळेचं  नाव आहे SNBP International School! माझ्या टीचर खूप छान शिकवतात. 
 
यंदा सुद्धा मी सुटीत खूप खूप मज्जा केली. यावेळेला मी कराटे, स्विमिंग आणि handwriting चा क्लास लावला होता. अर्थातच तुम्ही ओळखलं असेल की यातला कोणताच मी पूर्ण केला नाही!!! मला लिहिण्याचा जाम कंटाळा आहे. मी परीक्षेत सुद्धा कधी कधी पूर्ण paper सोडवत नाही. इतका वेळ कोण लिहील? याबद्दल मला सगळे भरपूर रागावतात. पण मी तरी काय करू? मला चित्र रंगवायला प्रचंड आवडतं. मी रंगवलेली काही चित्रं  तुम्हाला आवडेल न पहायला? ही बघा! हे चित्र मी माझ्या वाढदिवशी काढलं आणि रंगवलं. यात एक होडी समुद्रात तरंगतांना दिसते. तुम्हाला चित्र कसं वाटलं ते please सांगाल बरं!

 
आणखी बरीच चित्रं आहेत पण ती पुढच्या पोस्ट साठी राखून ठेवतो. मला maths इंटरेस्टिंग वाटतं. पण tables learn करायला अज्जिब्बात आवडत नाही. कित्ती बोअर होतं त्याने! मला टी व्ही बघायला  फार फार आवडतं. पण आता मी मोठा झालोय न म्हणून छोटा भीम नाही बघत त्यापेक्षा मला Dinosaur Train, Roll No २१ आणि Tintin हे शोज जास्त आवडतात. तुम्हाला कोणते प्रोग्राम आवडतात?
 
OK मित्रांनो नंतर गप्पा मारुयात! Bye Bye!!!
 
Monday, August 13, 2012

ईशान्यची धमाल!


आज मी तुम्हाला इशुच्या गमती-जमती सांगणार आहे बरं का! त्याला थोडं थोडं बोलता येतं. तर तो कस बोलतो माहितीये? सविता दीदीला सीता म्हणतो, तान्या दीदीला ताया म्हणतो आणि मला (त्याला खूप राग आला कि) माधव ऐवजी बादव म्हणतो! आहे ना बुद्दू! त्याला मी कित्ती वेळा शिकवलं पण काही उपयोग नाही! सारखा माझ्या मागे मागे फिरत असतो. माझी पुस्तकं, पेन्सिल, वह्या सगळं त्याला हवं असतं. मग मी काय करतो माहितीये? मी मुद्दाम माझी जुनी पुस्तकं उघडून बसतो. कि लगेचच तो ती मागायला लागतो. मी पण शहाण्या दादासारखं (असं आई म्हणते) लगेच त्याला ती देतो. आणि मग .....माझी खरी पुस्तकं काढतो. (कुणाला सांगू नका!) 
काल काय गम्मत झाली सांगू का? रात्रीचे अकरा वाजले तरी इशू झोपतच नव्हता! मी बाबांना म्हणालो कि मी इशुला एक गोष्ट सांगतो तर बाबा म्हणाले कि सांग. मग मी त्याला कावळेदादा आणि चिऊताई यांची गोष्ट सांगितली. थांबा! तुम्हाला पण सांगतो. एक किनई खूप आळशी कावळा असतो. (इशुना कावळ्याला काव्वा म्हणतो! हि हि हि!!!) तो कधीच लवकर उठत नाही. पटापट त्याचं आवरत नाही. त्याला खूप वेळा हाका मारल्यानंतर तो उठतो. नंतर खूप वेळ लोळ्या खातो! (म्हणजे लोळत राहतो) नन्तर हळूहळू ब्रश करतो. असा तो कावळा किनई खूप आळशी आणि हळूबाई असतो. मी इतकंच सांगितलं तर बाबा म्हणाले कि इशुला तुझ्याबद्दल नाही कावळ्याबद्दल सांग! हुं!! मला अस्सा राग आला ना! तरी पण मी गोष्ट सांगतच राहिलो. तर एकदा काय होतं कि खूप जोरदार पाऊस येतो.  कावळेदादाने घर बांधलेलच नसत! मग काय? तो भिजायला लागतो. तेव्हा त्याची फ्रेंड चिऊताई असते ना तिची आठवण येते. तो तिच्या घराची बेल वाजवतो. तर ती उघडतच नाही. तो पुन्हा पुन्हा वाजवतो. तरी पण ती उघडत नाही. तो तिला हाक मारतो. तेव्हा ती आतून म्हणते कि तू तुझं घर का बांधलं नाहीस? त्यावर कावळे दादा तिला सॉरी म्हणतो. मग थोड्या वेळाने ती त्याला घरात घेते आणि म्हणते कि तू आळशीपणा केलास आणि घर बांधल नाहीस म्हणून मी तुला लवकर घरात घेतलं नाही. पण तुला आता कळल ना कि घर किती महत्वाचं असतंय ते? 
अस्सा चिऊताईने  कावळ्याला धडा शिकवला! ती त्याची फ्रेंड होती ना म्हणून तिने त्याला घरात घेतले!! आपल्या फ्रेंडवर  कधी रागवायचे असते का? संपली माझी गोष्ट!

Monday, May 14, 2012

लब्बाड इशू!

 आज  न  मी तुम्हाला इशुची एक  गम्मत  सांगणार आहे! इशू पण खूप  बदमाष  झालाय  बरं.  त्याला मस्ती करायला फार आवडतं. तर एकदा ना तो सगळ्यांची  नजर चुकवून  टेरेस वर गेला. आईचं लक्ष  गेल्यावर ती त्याच्या मागे धावली. तर तो चक्क  टेरेस  वर लोळायला लागला.  हा पहा इथे!

अं  अं  मी नाही येणार!
मी इथेच खेळणार!
मग आई त्याला समजावू लागली कि अरे इशू असं टेरेस वर लोळू नये. घाण आणि माती लागेल कपड्यांना  वगैरे वगैरे.  त्यावर इशू उठून  उभा राहिला आणि टेरेस वर  इकडे तिकडे हिंडू लागला. त्याला तितक्यात  बॉल  सापडला. 
हे बघ आई! बॉल..... ईशान्य आता चांगलाच  रंगात आला होता. त्याने लगेच  तुळशीकडे त्याचा मोर्चा वळवला.  

तुळशीची माती ...किती छान 

माती अशी आकाशात  फेकतात 

जमिनीवर टाकतात


काय  त्याची  मज्जा चालू  होती ते वरच्या फोटोवरून  कळतंय . त्याला खरं काय करायचं होतं टेरेस  वर हे मात्र  आणखी scroll केल्यावर कळेल. 

...............................................................................
...............................................................................
....................................................................................................................................................................................................................................................................................................................................
.
.
.
.
.


आणि खातात सुद्धा!


बरोब्बर चोर सापडला ! त्याला मातीच  खायची होती! 


Friday, May 11, 2012

याहू ....सुट्टी लागली!!! मज्जाच मज्जा!!!
हेल्लो मित्रांनो! 

सध्या मी सुट्ट्या enjoy करण्यात फार बिझी आहे. आधी मी आजी-आजोबांकडे गेलो. तिथे भरपूर नवीन मित्र बनवले. वाळूत खेळलो. पाण्यात डुंबलो. अशी खूप खूप ऐश केली. सध्या मुक्काम आत्याच्या घरी आहे. तिथे श्रेयश दादा, गौरी दीदी सोबत माझी खूप मस्ती चालू आहे. तर तिथलीच एक गम्मत मी तुम्हाला सांगतो बर का!

माझी आत्या किनई शिकवण्या घेते. पाचवीपासून बारावी पर्यंत . सुट्टी असली तरी बिच्चाऱ्या दहावीच्या मुलांना यावच लागत . तर एकदा काय झाल माहितीये का? एका दहावीच्या दादाला मी विचारलं कि तुला शुभं करोति येत का? तर काय गम्मत ! तो नाही म्हणला! मग मी त्याला शुभं करोति म्हणून दाखवलं. हे सगळ आत्यानी ऐकल आणि म्हणाली कि मी रोज या मुलांना शुभं करोति शिकवायचं. मी आता रोज सगळ्या दहावीच्या मुलांना शुभं करोति शिकवतो आणि त्याची फी पण वसूल करतो. कशी? तर आमच ठरलय कि रोज एकतरी दहाविवाला दादा / दीदी मला चॉकलेट आणणार. आहे न ऐश?

आणखीन बऱ्याच गमती जमती चालू आहेत पण त्या पुढच्या वेळेस सांगेन. तोपर्यंत तुम्ही सगळे  खालचे फोटो enjoy करा. ( हे च  सगळ  मी खातोय  ना इकडे! ) 

ताजा कलम :  आत्या उद्या माझ्या  साठी पावभाजी बनवणार आहे! तुम्हाला टुक  टुक  वडा !! 


Sunday, February 5, 2012

केव्हढा हा होमवर्क!

मी रोज आईला सांगत असतो कि माझी टीचर मला खूप जास्त होमवर्क देते. पण आईला ते पटतच नाही! आत्ता कालच बघाना. मला टीचरने १ ते ५० लिहायला सांगितले होते. मला किनई खूप कंटाळा आला होता. म्हणून मी आईला म्हणालो कि मी १ ते ४० च लिहिणार. त्यावर आई मला रागावली! म्हणाली १ ते ५० च लिहायचं.  मग मी तिला म्हणालो कि तू मला थोडा discount दे न! काय झालं माहितीये का मग? आईला कळलंच नाही कि मला discount  कसं माहित ते. तिने विचारल्यावर मी समजावलं कि ती कशी नेहमी जाहिराती बघून १०% , २०% discount म्हणत असते. त्यावरून मला कळलंय.  आई जरा चकितच झाली होत्ती! इतकं करून सुद्धा आईने मला सगळ लिहायलाच लावलं. 

 होमवर्क झाल्यावर मी आईला विचारलं कि तिला कुठे  होमवर्क असतो. तर ती म्हणाली कि घरी आल्यावर तिला जे काम करावे लागते जसं कि ईशान्यला भरवणे, माझा अभ्यास घेणे, आम्ही दोघांनी केलेले पसारे आवरणे इ. हा सगळा तिचा  होमवर्क! मग मी खूप वेळ विचार करत होतो. मला वाटलं कि जसा मला, आईला, आज्जीला, बाबांना  होमवर्क आहे तसा ईशान्यला का नाही? पण मग मी समजलो कि दंगा करणे, माझ्याशी मस्ती करणे, घरभर हुंदडणे हा त्याचा घरचा अभ्यास! मी तसं आईला सांगितल्यावर तिने मला शाब्बास म्हटले. आहे कि नाही मी हुशार? 

पण तरी पण एक प्रश्न राहिलाच माझ्या मनात. तो मी आईला दुसऱ्या दिवशी विचारला. मी म्हणालो आईला कि देवबाप्पाचा  होमवर्क काय बरं? पण लगेचच मला त्याचे उत्तर सुचले सुद्धा! माझ्या सारख्या छोट्या छोट्या हुशार मुलांना बनवणे हाच देवबाप्पाचा  होमवर्क! हो कि नाही? आहे कि नाही मी हुशार?

मी लहानपणापासून किती अभ्यासू आहे न!