Monday, August 13, 2012

ईशान्यची धमाल!


आज मी तुम्हाला इशुच्या गमती-जमती सांगणार आहे बरं का! त्याला थोडं थोडं बोलता येतं. तर तो कस बोलतो माहितीये? सविता दीदीला सीता म्हणतो, तान्या दीदीला ताया म्हणतो आणि मला (त्याला खूप राग आला कि) माधव ऐवजी बादव म्हणतो! आहे ना बुद्दू! त्याला मी कित्ती वेळा शिकवलं पण काही उपयोग नाही! सारखा माझ्या मागे मागे फिरत असतो. माझी पुस्तकं, पेन्सिल, वह्या सगळं त्याला हवं असतं. मग मी काय करतो माहितीये? मी मुद्दाम माझी जुनी पुस्तकं उघडून बसतो. कि लगेचच तो ती मागायला लागतो. मी पण शहाण्या दादासारखं (असं आई म्हणते) लगेच त्याला ती देतो. आणि मग .....माझी खरी पुस्तकं काढतो. (कुणाला सांगू नका!) 
काल काय गम्मत झाली सांगू का? रात्रीचे अकरा वाजले तरी इशू झोपतच नव्हता! मी बाबांना म्हणालो कि मी इशुला एक गोष्ट सांगतो तर बाबा म्हणाले कि सांग. मग मी त्याला कावळेदादा आणि चिऊताई यांची गोष्ट सांगितली. थांबा! तुम्हाला पण सांगतो. एक किनई खूप आळशी कावळा असतो. (इशुना कावळ्याला काव्वा म्हणतो! हि हि हि!!!) तो कधीच लवकर उठत नाही. पटापट त्याचं आवरत नाही. त्याला खूप वेळा हाका मारल्यानंतर तो उठतो. नंतर खूप वेळ लोळ्या खातो! (म्हणजे लोळत राहतो) नन्तर हळूहळू ब्रश करतो. असा तो कावळा किनई खूप आळशी आणि हळूबाई असतो. मी इतकंच सांगितलं तर बाबा म्हणाले कि इशुला तुझ्याबद्दल नाही कावळ्याबद्दल सांग! हुं!! मला अस्सा राग आला ना! तरी पण मी गोष्ट सांगतच राहिलो. तर एकदा काय होतं कि खूप जोरदार पाऊस येतो.  कावळेदादाने घर बांधलेलच नसत! मग काय? तो भिजायला लागतो. तेव्हा त्याची फ्रेंड चिऊताई असते ना तिची आठवण येते. तो तिच्या घराची बेल वाजवतो. तर ती उघडतच नाही. तो पुन्हा पुन्हा वाजवतो. तरी पण ती उघडत नाही. तो तिला हाक मारतो. तेव्हा ती आतून म्हणते कि तू तुझं घर का बांधलं नाहीस? त्यावर कावळे दादा तिला सॉरी म्हणतो. मग थोड्या वेळाने ती त्याला घरात घेते आणि म्हणते कि तू आळशीपणा केलास आणि घर बांधल नाहीस म्हणून मी तुला लवकर घरात घेतलं नाही. पण तुला आता कळल ना कि घर किती महत्वाचं असतंय ते? 
अस्सा चिऊताईने  कावळ्याला धडा शिकवला! ती त्याची फ्रेंड होती ना म्हणून तिने त्याला घरात घेतले!! आपल्या फ्रेंडवर  कधी रागवायचे असते का? संपली माझी गोष्ट!